भारत दौरा सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराची अचानक निवृत्ती
Aaron Finch Retirement: ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकप विजेता कर्णधार अॅरॉन फिंचने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हा निर्णय भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दोन दिवस आधी घेतल्याने सर्वांना धक्क बसला आहे.
सिडनी: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. संघातील स्टार खेळाडू अॅरोन फिंच याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फिंचने याआधीच वनडेमधून निवृत्ती जाही केली होती. त्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वनडेतून निवृत्ती घेतली होती. भारताविरुद्ध होणऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या आधी फिंचने हा निर्णय घेतल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
फिंचने ऑस्ट्रेलियाकडून ५ कसोटी, १४६ वनडे, १०३ टी-२० मॅच खेळल्या आहेत. फिंच हा ऑस्ट्रेलियाचा एकमेव खेळाडू आहे ज्याने ७६ टी-२० सामन्यात देशाचे नेतृत्व केले. टी-२० करिअरमध्ये फिंचने १०३ सामन्यात ३४.२८च्या सरासरीने धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १४२.५ इतका आहे. २०१८ साली झिम्बाबेविरुद्ध फिंचने ७६ चेंडूत १७२ धावा केल्या. आता त्याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याआधी संघाला बसलेला हा मोठा झटका मानला जात आहे.
निवृत्तीची घोषणा करताना फिंचने म्हटले की, "मला या गोष्टीची जाणीव आहे की मी आता २०२४चा टी-२० वर्ल्डकप खेळू शकत नाही. अशात निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे, ज्यामुळे संघाला पुढील रणनितीवर काम करता येईल. माझे कुटुंबीय, पत्नी, संघ आणि ऑस्ट्रेलियाच क्रिकेटचा आभार व्यक्त करतो, ज्यांनी संपूर्ण करिअरमध्ये मला पाठिंबा दिला. या काळात चाहत्यांनी देखील खुप पाठिंबा आणि प्रेम दिले. २०२१ साली टी-२० वर्ल्डकप आणि २०१५ साली वनडे वर्ल्डकप जिंकणे हे माझ्यासाठी सर्वात खास होते. या १२ वर्षात देशासाठी खेळणे, अनेक सर्वोत्तम खेळाडूंचा सामना करणे, या अशा गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाला हव्या असतात". निवृत्तीनंतर फिंच काय करणार आहे याची माहिती दिली नाही.
