पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; आफ्रिदीवर घातली दोन वर्षांची बंदी
Asif Afridi Ban: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) फिरकी गोलंदाज आसिफ आफ्रिदीवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. पीसीबीच्या लाचलुचपत प्रतिबंधक संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल, आफ्रिदीवर ही बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून स्पिनर आसिफ आफ्रिदीवर बंदी घालण्यात आली आहे. भ्रष्टाचारविरोधी संहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी घातली आहे. खैबर पख्तुनख्वामधील या डावखुऱ्या फिरकीपटूवर भ्रष्टाचारविरोधी संहितेचे दोनदा उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यापैकी एकदाही त्याने पीसीबीला फिक्सिंगसाठी संपर्क साधल्याची माहिती दिली नाही.
आसिफने राष्ट्रीय टी-२० चषकातील बहुतेक सामने गमावले आहेत. आता तो दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धामध्ये भाग घेऊ शकणार नाही. पीसीबीने त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची संपूर्ण माहिती दिलेली नाही, मात्र त्याला नुकतेच निलंबित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
३५ वर्षीय आसिफने ३५ प्रथम श्रेणी, ४२ लिस्ट ए आणि ६५ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे ११८, ५९ आणि ६३ विकेट्स घेतल्या आहेत. आसिफ आफ्रिदीच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक शतक आहे. आसिफने ३१ ऑगस्ट रोजी नॅशनल टी-२० कपमध्ये शेवटचा सामना खेळला होता.
